विद्यार्थिनींनी झाडांना राख्या बांधून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश.
अंबाजोगाई/दिलीप कांबळे
राखी पौर्णिमा हा भाऊ–बहिणीच्या प्रेमाचा सण देशभर उत्साहात साजरा होत असताना, योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित श्रीमती गोदावरीबाई कुंकूलोळ योगेश्वरी कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सणाला वेगळा पर्यावरणपूरक स्पर्श दिला.
निसर्ग संवर्धन मंडळाच्या उपक्रमांतर्गत वसतीगृहातील विद्यार्थिनींनी परिसरातील प्राचीन “मातृवृक्षांना” राख्या बांधून, “वृक्ष आमचे भाऊ आहेत, ते दीर्घायुषी राहोत आणि प्रदूषणाच्या दैत्यापासून आमचे रक्षण करो” अशी प्रार्थना केली.
वृक्षतोडीमुळे बिघडणारा निसर्गाचा समतोल आणि वाढते ग्लोबल वॉर्मिंग यावर उपाय म्हणून वृक्षसंवर्धनाची गरज ओळखत, हा उपक्रम केवळ औपचारिकता न ठेवता वेळोवेळी या वृक्षांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करण्याचा संकल्पही विद्यार्थिनींनी व्यक्त केला.
या रक्षाबंधनासाठी पर्यावरणाला हानीकारक घटकांना वगळून पूर्णपणे पर्यावरणपूरक साहित्य वापरण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन व मार्गदर्शन वसतीगृहाचे गृहपाल व शिक्षिकांनी केले.

