सुशोभीकरणाच्या नावाखाली तलावाच्या काठावरुनच होतोय बेकायदेशीर मुरुमाचा उपसा ! केज येथील प्रकार ! आढवळणी मार्गावरील गावापासून 4/5 किलोमीटर अंतरावर सुशोभीकरण करण्याचा घाट.
सुशोभीकरणाच्या नावाखाली तलावाच्या काठावरूनच होतोय बेकायदेशीर मुरुमाचा उपसा! केज येथील प्रकार !
आढवळणी मार्गावरील गावापासून 4/5 किलोमीटर अंतरावर सुशोभीकरण करण्याचा घाट.
केज/प्रतिनिधी
केज नगरपंचायत हद्दीतील राजीव गांधी पाझर तलाव परिसरात व तलावाच्या काठावरील मुरुम अर्थात गौन खनिजाचा बेकायदेशीररीत्या उपसा सुरु असल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे या तलावाच्या कामासाठी टाकळी गावातील एकूण 20 शेतकऱ्यांची जमीन शासनाने संपादीत केली असून, सदरील प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने शासनाने संपादीत केलेल्या जमिनीचा शासनाने त्या शेतकऱ्यांनी मागणी केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना मोबदला देण्याचे आदेश दिले तरी अद्याप कोणत्याही शेतकऱ्याला मोबदला मिळालेला नाही. तरी देखील केज पासून बऱ्याच अंतरावर असलेल्या तलावाचे सुशोभीकरणाचे काम गुपचूपपणे सुरु असल्याचा आरोप होत आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की केज शहरापासून 4/5 किलोमीटर अंतरावर आढवळणी मार्गावरील माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी भेट दिल्यानंतर या तलावाला राजीव गांधी असे नाव देण्यात आले होते. या तलावाच्या निर्मिती साठी शासनाकडून एकुण 20 शेतकऱ्यांची जमीन संपादन केली होती. मात्र संपादित केलेल्या शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत एक दमडीही दिलेली नाही. त्यामुळे सदरील शेतकरी हे संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा मिळवण्यासाठी न्यायालयात गेले होते. त्यावर न्यायालयाकडून सदरील शेतकऱ्यांना शासनाने त्यांच्या संपादीत जमिनीचा मावेजा देण्याचे आदेश देण्यात आले होते. तरी देखील आजपर्यंत या शेतकऱ्यांना शासनाने एक दमडीही दिलेली नाही. सदरील क्षेत्र हे केज नगरपंचायतच्या हद्दीत येत असल्याने व या ठिकाणी शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या योजना राबवुन त्याचा निधी घशात घालण्यासाठी त्यांनी उलट या ठिकाणी गाव सोडून एवढ्या दुरवर या तलावाचे सुशोभीकरण करण्याचा घाट घातला आहे. तर या सुशोभीकरणाच्या नावाखाली काही लोकांनी तलावाच्या काठावरील लाखो रुपयांचे गौण खनिज दिवसाढवळ्या नेहण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे ज्यांच्या जमिनी या तलावात गेल्या आहेत. ते शेतकरी आता संतापले असुन जोपर्यंत तलावात गेलेल्या आमच्या शेत जमीनीचा मोबदला अर्थात मावेजा आम्हाला मिळत नाही. तोपर्यंत या ठिकाणी कसल्याही प्रकारचे काम आम्ही करू देणार नाहीत. असा ठाम निर्णय या शेतकऱ्यांनी घेतला आहे. तर या संदर्भात शंकर भिमराव घुले, आण्णा भिमराव घुले, अच्युतराव राणबा घुले, यशवंत रामभाऊ घुले, जयवंत रामभाऊ घुले, गणपत लक्ष्मण घुले यांच्यासह 14 शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग केज, तहसीलदार केज व नगरपंचायत मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले. या निवेदनात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, शेतकऱ्यांचा संपूर्ण मोबदला मिळाल्याशिवाय तलावातून कोणताही मुरुम उपसा किंवा सुशोभीकरणाचे काम सुरु करू नये, तसे केल्यास त्याला रोखण्यासाठी आम्ही सर्व शेतकरी आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही मोठे आंदोलन उभे करू असा ठाम निर्धार या शेतकऱ्यांनी केला असुन या तलावाचा बांध / भिंत दुरुस्त करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या या निवेदनावर एकूण 20 शेतकऱ्यांच्या सह्या असून, त्यांच्या मागण्यांची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन या ठिकाणी गौण खनिजाची चोरी करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी नेते महादेव घुले यांनी केली आहे. या प्रकरणामुळे केज शहरात पुन्हा एकदा प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, संबंधित विभागांकडून तातडीने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी होत आहे. तर आमच्या मागण्या शासनाने तात्काळ मान्य करुन न सोडल्यास आम्ही सर्व शेतकरी शासनाच्या विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
केज नगरपंचायतच्या हद्दीत असलेल्या राजीव गांधी पाझर तलावातील गौण खनिजाचा राजकीय नेत्यांच्या आशिर्वादाने बेकायदेशीरपणे मुरुमाचा उपसा मोठ्या प्रमाणावर होत असुन प्रशासनाने अद्यापपर्यंत या मुरुम चोरांवर कसल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. त्यामुळे शासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन या मुरूम चोरांवर तातकाळ कार्यवाही करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे केज तालुकाध्यक्ष महादेव घुले यांनी म्हटले आहे.

