वंचित बहुजन आघाडीचे केज शहराध्यक्ष व रोखठोक न्यूजचे संपादक बाबासाहेब मस्के यांच्या कॅन्सरची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली असून ते सध्या उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आणि मनोबल वाढविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात (दादा) आंबेडकर यांनी अंबाजोगाई येथे त्यांच्या घरी भेट दिली.
या भेटीदरम्यान सुजात आंबेडकर यांनी मस्के यांची तब्येत जाणून घेतली, त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली तसेच त्यांच्या लवकरात लवकर प्रकृतीस सुधारणा व्हावी, यासाठी शुभेच्छा दिल्या. पक्षाच्या व वैयक्तिक पातळीवरील सर्व सहकार्याची खात्रीही त्यांनी यावेळी दिली.
बाबासाहेब मस्के हे पत्रकारितेतील निर्भीड भूमिका आणि सामाजिक प्रश्नांवर रोखठोक मत मांडण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या प्रकृतीविषयी पक्षातील कार्यकर्त्यांसह सामाजिक क्षेत्रातही चिंता व्यक्त होत होती. सुजात आंबेडकर यांच्या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
मस्के यांनीही या भेटीबद्दल समाधान व्यक्त करत लवकरच पूर्ववत कार्यरत होण्याचा विश्वास व्यक्त केला. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी विविध स्तरांतून शुभेच्छांचा ओघ सुरू आहे. यावेळी मस्के यांच्या पत्नीही उपस्थित होत्या. सुजात दादा यांनी त्यांना धीर देत, काळजीपूर्वक उपचार सुरू ठेवण्याचा सल्ला दिला.