माळेगावात शिवप्रेमाचे प्रतीक!
माळेगावात शिवप्रेमाचे प्रतीक उभे – अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे अनावरण
केज/सचिन भालेराव
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील माळेगाव ग्रामस्थांच्या अनेक वर्षांपासूनच्या अपेक्षेला आणि श्रद्धेला मूर्त स्वरूप देत माळेगाव येथे शौर्य, स्वाभिमान आणि हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणास्तंभ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य अश्वारूढ स्मारक उभारण्यात आले आहे.
हे स्मारक उभारण्यामागे धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. बाळराजे (दादा) आवारे पाटील यांचे मोलाचे योगदान आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून माळेगाव ग्रामस्थांच्या हृदयात असलेले शिवस्मारकाचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरवले.
हे स्मारक केवळ एक ऐतिहासिक चिन्ह नसून, गावातील तरुणाईला प्रेरणा देणारे व स्वाभिमान जागवणारे एक शौर्याचे प्रतीक ठरले आहे.
या स्मारकामुळे माळेगाव हे गाव आता शिवप्रेम, संस्कृती आणि इतिहासाच्या जतनाचे केंद्र बनले असून, यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामस्थांनी आणि शिवभक्तांनी श्री. बाळराजे दादा आवारे पाटील यांचे मन:पूर्वक आभार मानत, त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.
“हे स्मारक म्हणजे आमच्या श्रद्धेचे आणि अभिमानाचे प्रतीक आहे,” अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.

