केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील विविध राशन दुकानांमध्ये नागरिकांना मिळणाऱ्या ज्वारीच्या धान्यात मोठ्या प्रमाणात किड, अळ्या व जाळी आढळत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या गंभीर गैर प्रकाराविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दि २६ नोव्हेंबर रोजी तहसीलदार केज यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले की, शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत मिळणारे ज्वारीचे धान्य अत्यंत निकृष्ट, अस्वच्छ व आरोग्यास हानिकारक स्वरूपाचे आहे. अशा निकृष्ट धान्याचे वितरण हा ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणारा गंभीर प्रकार असून तातडीने तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
हे निवेदन लिंबराज गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयात सादर करण्यात आले. यावेळी तालुका प्रवक्ते प्रदीप गायकवाड, सतीश बनसोडे, भैय्यासाहेब आरकडे, दत्ता गायकवाड, पांडुरंग जोगदंड आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रकरणात तातडीने समाधानकारक कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.