ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अतिवृष्टीच्या राज्यातही माळेगाव तहानलेले! पाणी दीड महिन्याला, पाणीपट्टी मात्र महिन्याला.


केज/सचिन भालेराव

महाराष्ट्रात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने गावोगावी हाहाकार माजवला. शेतकरी उद्ध्वस्त झाला, संसार वाहून गेले, घरे पडली, अनेक कुटुंबे रस्त्यावर आली. अशा या आपत्तीजन्य परिस्थितीत सरकारकडून मदतीच्या घोषणा होत असल्या तरी प्रत्यक्षात गावकऱ्यांच्या जगण्याचा प्रश्न सुटलेला नाही.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील माळेगाव हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. येथे आजही गावकऱ्यांना पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष करावा लागत आहे. पाण्याच्या अभावामुळे अनेक कुटुंबांना शेतात जाऊन राहावे लागत आहे. काहींनी शेतातूनच पाइपलाईन टाकून गावात पाणी आणण्याचा प्रयत्न केला असला तरी ते पुरेसे नाही. गावातील बहुतांश लोकांना दररोज पाण्यासाठी भटकंती करावी लागते.

सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पाणी दीड महिन्याला एकदा मिळते, मात्र पाणीपट्टीची वसुली मात्र दर महिन्याला कडक केली जाते. गावकऱ्यांच्या डोक्यावर पाण्याचा टंचाईचा डोंगर आणि खिशावर पाणीपट्टीचा अन्याय – या दुहेरी संकटामुळे ग्रामस्थांच्या नाराजीला ऊत आला आहे.

या परिस्थितीत प्रशासनाची भूमिका प्रश्नांकित ठरते. पाणीपुरवठ्याची सोय नीट करणे, पाईपलाईनचा विस्तार करणे, विहिरी-बोअरवेल दुरुस्ती करणे किंवा टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा करणे – हे उपाय तातडीने हाती घेणे गरजेचे आहे. अन्यथा माळेगावातील तहानलेले वास्तव हे केवळ प्रशासनाच्या उदासीनतेचे आणखी एक उदाहरण ठरेल.

आजच्या काळात गावोगावी लाखो लिटर पाणी वाहून जात असताना माळेगावात तहान भागवण्यासाठी संघर्ष व्हावा, हे शासनव्यवस्थेचे अपयशच म्हणावे लागेल.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *