अतिवृष्टीने राज्यभर हाहाकार; पण केज तालुक्यातील माळेगाव आजही पाण्याच्या टंचाईशी झुंजतंय!
केज/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे गावोगाव पाणी साचले असून शेतकरी आणि नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. घरांची पडझड, जनावरांचे मृत्यू, शेतातील उभे पीक पाण्यात बुडाले आणि शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. मात्र या उलट चित्र बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील माळेगाव गावात दिसून येत आहे. येथे आजही नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
माळेगावातील बहुतांश कुटुंबांना पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत असून, काही कुटुंबांना तर शेतात जाऊन राहावे लागत आहे. शेतातील विहिरी किंवा बोअरवेलमधून पाणी मिळावे म्हणून लोकांना घरापासून अंतर कापावे लागते. गावातील काही भागात शेतातून पाईपलाईन टाकून गावात पाणी आणले गेले असले तरी ते अत्यंत अपुरे ठरत आहे. त्यामुळे अनेक गरीब कुटुंबांना रोजच्या रोज पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, “राज्यातील धरणे भरून वाहू लागली, नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत, पण आमच्या गावात आजही थेंब थेंब पाण्यासाठी भटकंती करावी लागते. प्रशासनाकडून आम्हाला मदतीचे आश्वासन दिले जाते, मात्र प्रत्यक्षात काहीच होत नाही.”
गावातील महिला पाण्याच्या टंचाईने सर्वाधिक त्रस्त आहेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांना पाणी भरण्यासाठी धावपळ करावी लागते. दिवसभर पाण्याच्या घागरी डोक्यावर घेतलेल्या महिलांचे चित्र पाहून प्रशासनाचा कारभार उघड होतो, असे ग्रामस्थांचे मत आहे.
दरम्यान, अतिवृष्टीमुळे ज्या गावात पाणी ओसंडून वाहत आहे, तिथेच माळेगावसारखी गावे मात्र पाण्याच्या अभावाने कराहत आहेत. या टोकाच्या विरोधाभासामुळे शासनाच्या पाणीपुरवठा योजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाला तातडीने पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

