जिद्द, परिश्रमातून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करा : जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन
बीड जिल्हा प्रशासनातर्फे प्रेरणादायी व्याख्यानमाला
स्पर्धा परीक्षा तयारीत विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने जिल्हाधिकारी जॉन्सन यांच्या संकल्पनेतून बीड जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता.14) स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन झाले. या उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरात परीविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्रीमती पूजा पवार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड झालेले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्णकुमार बाहेती यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी हरिष धार्मिक, नायब तहसीलदार प्रशांत जाधवर, राजेश सुपेकर, महादेव चौरे, दादासाहेब शेळके आदी उपस्थित होते.
स्पर्धा परीक्षेचा प्रवास व्यक्तिमत्त्व विकासाचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. तरूणांच्या ध्येयपूर्तीसाठी स्पर्धा परीक्षेसाठीचे मार्गदर्शन निश्चित जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येईल. तरी देखील प्रत्येकाने स्पर्धा परीक्षेत, यासह जीवनात यश संपादन करण्यासाठी स्वत:चे स्पष्ट ध्येय ठेवावे. जिद्द व परिश्रमातून आपल्या कुटुंबीयांसह जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी तरूणांना केले.
श्रीमती पवार यांनी स्वानुभवातून विद्यार्थ्यांना प्रेरित केले. स्वप्नांचा पाठपुरावा, नैतिक मूल्यांची जाणीव आणि अभ्यासातील शिस्त या विषयांवर मार्गदर्शन केले. यशाचा प्रवास, अडचणींवर मात करण्याचे तंत्र, अभ्यासाचे नियोजन, वेळ व्यवस्थापन, परीक्षा तयारीतील सकारात्मक आणि नकारात्मक टप्पे याबाबत श्री. बाहेती यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी नैतिक मुल्ये, कौटुंबिक आणि सामाजिक समतोल याबाबतही विचार मांडले.
कार्यक्रमातील संवाद सत्रात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक आणि उपप्रादेशिक अधिकारी यांनी केले. अपर जिल्हाधिकारी धार्मिक यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन ग्राम महसूल अधिकारी काजल ससाणे आणि शरद घोडके यांनी केले. आभार जाधवर यांनी मानले.

