अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त पिकांची रमेश आडसकर यांनी केली पाहणी; शेतकऱ्यांना दिले मदतीचे आश्वासन
केज/सचिन भालेराव
गेल्या काही दिवसांपासून केज तालुक्यात संततधार पावसाचा जोर सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे शेतजमिनींमध्ये पाणी साचून तळ्याचे स्वरूप निर्माण झाले आहे. मोठ्या प्रमाणावर उभी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी हतबल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते रमेशराव आडसकर यांनी केज तालुक्यातील विविध गावांचा दौरा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली व पिकांची पाहणी केली.
आडसकर यांनी बोरगाव, भोपला, राजेगाव, दैठणासह अनेक गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन पिकांची स्थिती जाणून घेतली. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. या पाहणीदरम्यान त्यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून थेट संपर्क साधून तातडीने पंचनामे करण्याचे आणि शासनाकडे अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले.
रमेश आडसकर म्हणाले की, “शेतकरी बांधवांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. शासनाने या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने मदत जाहीर करावी. पंचनामे जलद गतीने होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळणे आवश्यक आहे.”

