बीडमध्ये ओला दुष्काळ जाहीर न झाल्यास मंत्र्यांना फिरू देणार नाही : रिपब्लिकन पार्टी (खरात गट )
अंबाजोगाईत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) तर्फे बैलगाडी मोर्चा : बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

अंबाजोगाई/दिलीप कांबळे
अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) तर्फे मंगळवारी (३० सप्टेंबर) अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडीसह आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

मराठवाडा विभागीय अध्यक्ष अक्षय भुंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतपिके व फळबागांचे पंचनामे करून सरसकट नुकसानभरपाई द्यावी, घरांची पडझड व स्थलांतरीत कुटुंबांना मदत करावी, कर्ज व वीजबिल वसुली थांबवावी, शैक्षणिक शुल्क माफ करावे, संजय गांधी/श्रावणबाळ योजनांचे थकलेले मानधन द्यावे अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

मोर्चात शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि विविध शासकीय योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी अक्षय भुंबे, जिल्हाध्यक्ष जीवन गायकवाड, प्रवक्ता धिमंत राष्ट्रपाल, महिला जिल्हाध्यक्षा मीनाताई लोंढे, तालुकाध्यक्ष बादल तरकसे, मुक्ता पाडुळे आदींनी मार्गदर्शन केले.
मोर्चेकऱ्यांनी इशारा दिला की, “शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई मिळाली नाही आणि ओला दुष्काळ जाहीर झाला नाही, तर यापुढे एकाही मंत्र्याला बीड जिल्ह्यात फिरू देणार नाही, त्यांचे तोंड काळे फासले जाईल.”

