बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात दिले पाहिजे – मुंबई आझाद मैदान आंदोलनासाठी केजमध्ये बैठक संपन्न
केज/सचिन भालेराव
बोधगया हे बिहार राज्यातील गयाजवळ असलेले ऐतिहासिक व धार्मिक स्थान आहे. येथेच भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती. या ठिकाणी उभारलेले महाबोधी विहार हे जगभरातील बौद्ध धर्मीयांसाठी सर्वाधिक पवित्र स्थान मानले जाते. या स्थळाला युनेस्कोने “विश्व वारसा यादी” मध्ये स्थान दिले आहे.
मात्र, बोधगया महाबोधी मंदिराच्या व्यवस्थापनावर हिंदू पुजाऱ्यांचे नियंत्रण असल्यामुळे बौद्ध समाजात असंतोष निर्माण झाला आहे. बौद्ध धर्माचा जन्मस्थान व मुख्य केंद्र असूनही बौद्ध प्रतिनिधींना मंदिराच्या व्यवस्थापनात प्रमुख स्थान नाही, ही खंत बौद्ध बांधवांकडून व्यक्त केली जात आहे.
महाबोधी सोसायटी ऑफ इंडिया ची स्थापना १८९१,साली झाली संस्थापक अनगरिका धर्मपाल यांनी या चळवळीचे नेतृत्व केले होते. पुढे १९५३ मध्ये बिहार सरकारने “बोधगया मंदिर व्यवस्थापन अधिनियम लागू केला. या कायद्यानुसार ८ सदस्यीय व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली, ज्यात ४ हिंदू व ४ बौद्ध सदस्यांचा समावेश करण्यात आला परंतु अध्यक्षपद हिंदू धर्मीयाकडेच राहील असे बंधन ठेवण्यात आले. त्यामुळे बौद्ध समाजाचे असमाधान कायम आहे.
सम्राट अशोक यांनी इ.स.पू. तिसऱ्या शतकात येथे मंदिर व बोधीवृक्ष परिसराची निर्मिती केली होती. या पवित्र स्थळावर पुन्हा बौद्ध धर्मीयांचा ताबा यावा, या मागणीसाठी देशभरातील बौद्ध समाज एकवटत आहे.
त्याच अनुषंगाने, मुंबई येथे १४ ऑक्टोबर रोजी वार मंगळवार आझाद मैदानात “महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे ” या मागणीसाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चासाठी शासनाने परवानगी नाकारली असली तरी लाखो बौद्ध बांधव धम्माच्या निष्ठेने या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर केज तालुक्यातील विविध बौद्ध संघटनांची बैठक दिनांक ९ ऑक्टोबर रोजी वार गुरुवार केज येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली. या बैठकीत आगामी १४ ऑक्टोबरच्या मोर्चात सकल बौद्ध समाजाचा सहभाग वाढवण्यासाठी सविस्तर चर्चा झाली.
बैठकीत “एक दिवस धम्मासाठी महा बौद्ध महाविहार मुक्ती साठी ” हा मूलमंत्र स्वीकारून सर्व बौद्ध बांधवांनी मोर्चासाठी सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले. या वेळी केज तालुक्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

