महाराष्ट्रराजकीय

बीडमध्ये शेतकरी संकटात; केंद्र सरकारकडून मदतीची मागणी


खा. बजरंग सोनवणेंनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट

केज/सचिन भालेराव

बीड जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती, घरे व पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार बजरंग सोनवणे यांनी (दि.१९) नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन केंद्र सरकारकडून तातडीने मदतीची मागणी केली. या वेळी खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या.
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. नदीपात्रापासून एक किलोमीटरपर्यंत पिके पाण्याखाली गेल्याने शेती, फळबागा व उपजाऊ माती वाहून गेली आहे. काही ठिकाणी घरांची पडझड झाली असून जनावरांचेही नुकसान झाले आहे.
केज तालुक्यात मांजरा नदीचे पाणी गावात शिरल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सोनवणे यांनी नुकतीच शेतात प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री व कृषीमंत्री यांना मदतीसाठी निवेदनही पाठवले होते.
सोनवणे म्हणाले, “बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांवर मोठे संकट ओढावले आहे. केंद्र सरकारने तातडीने मदत द्यावी, यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सविस्तर निवेदन दिले आहे.”
दरम्यान, प्रशासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून झालेल्या नुकसानीचे फोटो-व्हिडिओ जतन करून लेखी तक्रारीसोबत तहसील कार्यालयात सादर करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *