अंबाजोगाई नर्सिंग कॉलेजमध्ये बाबासाहेबांच्या विचारांचा अपमान, शिष्यवृत्ती गैरप्रकार; विद्यार्थी नेत्याची तक्रार
प्रतिनिधी/सचिन भालेराव
व्यंकटेश नर्सिंग कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राच्या वरचे बाजूस देवी-देवतांचे फोटो लावले असल्यामुळे संभ्रम निर्माण झाला असून, प्राचार्यांनी तक्रारकर्त्यांना उद्धट भाषेत उत्तर दिल्याची घटना समोर आली आहे. याशिवाय, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम कॉलेज प्रशासन हडप करत असल्याची गंभीर शंका निर्माण होत आहे. सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र राज्याचे पुणे जिल्हा निरीक्षक इंजि. अक्षय गोटेगावकर यांनी या प्रकरणाची माहिती वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा अध्यक्ष मा. शैलेश भाऊ कांबळे यांना पत्राद्वारे दिली आहे. तसेच बीड जिल्हा अधिकारी व बीड जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडे ही मेल द्वारे तक्रार केली आहे.
कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरील प्राचार्य कक्षात बाबासाहेबांच्या छायाचित्राच्या वर देवी-देवतांचे फोटो लावलेले असल्याचे गोटेगावकर यांनी निदर्शनास आणले. बाबासाहेबांनी देवी-देवता नाकारून बौद्ध धम्माचा विज्ञानवादी मार्ग दाखवला असल्याने हा प्रकार त्यांच्या विचारांचा अपमान करणारा आहे, असे ते म्हणाले. प्राचार्य सूर्यवंशी ( मोबाईल नंबर +919511005200) यांना याबाबत सूचना दिली असता, त्यांनी “बाबासाहेबांबद्दल किती भक्ती आहे हे तुम्ही सांगण्याची गरज नाही” अशी उद्धट भाषा वापरली आणि “फोटो कुठे लावायचे हे आम्ही ठरवू” असे उत्तर दिले.
याशिवाय, जाणीवपूर्वक प्रॅक्टिकल मध्ये नापास केले जाते , कॉलेजमध्ये मागासवर्गीय मुलींच्या शिष्यवृत्तीची पूर्ण रक्कम विद्यार्थ्यांना कॉलेज फी भरण्यास भाग पाडली जाते. शासनाकडून मिळणारी शिष्यवृत्ती कॉलेज प्रशासनाकडून हडपली जात असल्याची शंका आहे. शिष्यवृत्ती वेळेवर जमा न होणे किंवा नाकारली जाणे यामुळे विद्यार्थ्यांच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत विलंब होत असून, कागदपत्रे जाणीवपूर्वक अडवली जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक आणि शैक्षणिक त्रास सहन करावा लागत आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पुणे जिल्हा निरीक्षक श्री अक्षय गोटेगावकर यांनी पत्रात मागणी केली आहे की, प्राचार्य कक्षातील छायाचित्र व्यवस्था सुधारली जावी, शिष्यवृत्तीचा योग्य विनियोग आणि पारदर्शकता सुनिश्चित करावी, विद्यार्थ्यांना कागदपत्रे त्वरित उपलब्ध करून द्यावीत आणि गैरप्रकारांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.

