माळेगावात श्री.तुळजाभवानी देवी भव्य यात्रा उत्साहात पार पडली
केज/सचिन भालेराव
दर वर्षी प्रमाणे याही वर्षी केज ता. मौजे माळेगाव येथे श्री तुळजाभवानी देवीची भव्य यात्रा महोत्सव मोठ्या श्रद्धा, भक्तीभाव आणि उत्साहात पार पडली. सोमवार, दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ (कोजागिरी पौर्णिमा) रोजी झालेल्या या यात्रेस परिसरातील हजारो भाविक भक्तांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला.
यात्रेची सुरुवात पहाटे श्री तुळजाभवानी देवीच्या अभिषेक, महापूजा आणि भोगी वैवेद्याने झाली. दुपारी पारंपरिक गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला. या वेळी गावातील तरुण व भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
सायंकाळी देवीची भव्य मिरवणूक (छबीना) काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि आराधी मंडळीच्या गाण्यांच्या कार्यक्रमामुळे परिसर दुमदुमून गेला. संपूर्ण गाव भक्तीभावाने उजळून निघाला.
या यात्रेचे आयोजन समस्त ग्रामस्थ व तरुण मंडळ माळेगाव यांच्या वतीने करण्यात आले होते.
यात्रा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी लक्ष्मण धुराजी लोकरे व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.
अखेरीस सर्व भक्तांच्या मुखातून एकच घोष —
“आई राजा उदो उदो!”

