सोनेसांगवीचा गौरव! अमोल गुळवे सर राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवडले
केज/सचिन भालेराव
बीड जिल्हातील केज तालुक्यातील सोनेसांगवी गावचे सुपुत्र श्री. अमोल सुशीला माणिकराव गुळवे यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेल यांनी त्यांची राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली आहे.

श्री. अमोल गुळवे सर गेली 18 वर्षे ब्राह्मण पाडा एज्युकेशन सोसायटी संचलित शांतीग्राम विद्यामंदिर प्राथमिक विभागात अध्यापन कार्य करीत आहेत. त्यांनी तालुका व जिल्हास्तरावर सुलभक म्हणूनही उल्लेखनीय भूमिका बजावली आहे.
विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी म्हणून ते डिजिटल शिक्षणाचा प्रभावी वापर करतात. स्पर्धा परीक्षा तयारी, जापनीज भाषा शिकवणे, तसेच आनंददायी वातावरणात अध्यापन करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवतात.
गुळवे सर म्हणाले, “शांतिग्राम विद्यामंदिरात कार्य करण्याची संधी दिल्याबद्दल व्यवस्थापक डॉ. महेश गावडे यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.”
या निवडीमुळे विद्यार्थी, शिक्षक व पालक वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुरस्कार वितरण समारंभ 12 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता
काँग्रेस कमिटी प्रदेश कार्यालय, काकासाहेब गाडगिळ मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई येथे होणार आहे.
या यशामुळे सोनेसांगवी ग्रामस्थांमध्ये अभिमानाची भावना असून गावकऱ्यांनी आपल्या सुपुत्रावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

